नांदेड - महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी झाली आहे, असे खळबळजनक वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. मुंबई, मालाड, मालवणी आणि उस्मानाबाद येथे झालेल्या दंगलीत हिंदूंवर अत्याचार झाल्याचे सांगत, ही निवडणूक औरंगजेब विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये देगलूर-बिलोली मतदार संघ खेचून घेण्यासाठी टोकाचे विधाने पाहायला मिळत आहे.
देगलूर-बिलोली मतदारसंघ निवडणूक -
महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद होत आहेत, त्याला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघ पोटनिवडणूक प्रचारार्थ नितेश राणे देगलूर तालुक्यात आले आहेत. भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांना विजयी करा, असे आवाहन करत त्यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे.
'महाविकास आघाडीत औरंजेबाचे अनुयायी' -
देगलूर-बिलोली मतदारसंघ निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीत एक मेकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या नितेश राणे यांनी सरकार विरोधात गरळ ओकली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगजेबाच्या औलाद कार्यरत असल्याचे धक्कादायक विधान केले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील नेते नितेश राणे यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया देतील याकडे लक्ष लागले आहे.