नांदेड - सोमठाणा (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील साठवण तलावासाठी अधिगृहित केलेल्या जमिनीचा मावेजा देण्यात यावा, या मागणीसाठी सोमठाणा, हिप्परगा आणि बाभुळगाव येथील शेतकऱ्यांनी आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न साठवण तलावासाठी शंभर एकर जमीन संपादित -सोमठाणा येथे साठवण तलावासाठी नायगाव तालुक्यातील सोमठाणा, हिप्परगा आणि बाभुळगाव येथील जवळपास ५० शेतकऱ्यांची २०१३ मध्ये जवळपास शंभर एकर जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांची जमीन प्रशासनाने ताब्यात घेतली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना मावेजा दिला नाही. याबाबत सोमठाणा, हिप्परगाव आणि बाभुळगाव येथील शेतकऱ्यांनी १६ सष्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शासन नियमानुसार मोबदला देण्याची मागणी केली होती. मोबदला मिळाला नाही, तर २७ सप्टेंबरला आत्मदहनाचा इशारा शेतकरी लक्ष्मण धोडिंबा गायकवाड व मालू गणपती गायकवाड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला होता.
हे ही वाचा - अघोरी कृत्य.. वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार, मांत्रिक फरार
शेतकऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात -
दरम्यान, याबाबत जिल्हा प्रशासनाने काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे सोमवारी (दि. २७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.