नांदेड - जिल्ह्यातील हदगाव येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माने पुढाकार घेऊन थेट बांधावर जाऊन खते देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हदगाव तालुक्यातील रुई येथे आमदार माधवराव जवळगावकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मौजे रुई तालुका हदगाव येथील बळीराजा शेतकरी गटातील एकूण 20 सदस्यांनी 25 में टन खताची एकत्रीत खरेदी केली. गावपातळीवर गटांची मागणी घेऊन खत खरेदी गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी इतर सदस्याना घरपोच बांधावर रास्त भावात खते पुरवठा केला आहे. यामुळे कृषी सेवा केंद्रावर होणारी गर्दी यावर मात करुन कोरोना प्रादुर्भाव थांबविण्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
हदगाव तालुक्यात एकूण 167 सक्षम शेतकरी गट नोंदनीकृत आहेत. त्यातील 1 हजार में टन खत थेट बांधावर पुरवठा करण्याचा मानस असल्याचे तालुका कृषी विभागाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.