नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना टक्कर देण्यासाठी बापूसाहेब गोरठेकर यांना भाजप-शिवसेना महायुतीकडून मैदानात उतरवले आहे. अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर भाजपच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे.
हेही वाचा - गांधी@150 : रेल्वे मंत्रालयाने दाखवले ईटीव्ही भारतचे गीत
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता ते भोकर विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून भोकरमध्ये अशोक चव्हाण तळ ठोकून आहेत. मतदारसंघात त्यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. लोकसभेला पराभव झाल्यामुळे प्रचारात कुठलीही हयगय नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी चांगलेच कामाला लावले आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये ट्रकने मोटारसायकलस्वारांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच भोकर मतदारसंघातून त्यांचे वडील बाबासाहेब गोरठेकर यांनी नेतृत्व केले होते. बापूसाहेब गोरठेकर हे यापूर्वी नायगाव मतदारसंघाचे आमदार होते. त्यांचाही जनसंपर्क या भागात चांगला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४ हजार ७०० चे मताधिक्य होते. त्यात शिवसेना-भाजप युती झाली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या भागात लोकसभेपेक्षा युतीचे बळ अजून वाढले आहे. वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून नामदेव आयलवाड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचितने २७ हजार मते घेतली होती. त्यामुळे याचा लाभ भाजपच्या उमेदवाराला झाला होता.
हेही वाचा - नाशकात बाळासाहेब सानपांच्या उमेदवारीवर टांगती तलवार, 21 नगरसेवकांचे राजीनामे
यावेळीही भाजपला त्याची आशा आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराचे मनोधैर्य व बळ वाढले असून त्यांनाही विजय जवळ असल्याचे वाटत आहे. त्यासोबतच भाजप अशोक चव्हाण यांना मतदारसंघात गुंतून ठेवण्यातही यशस्वी होणार आहे. उमेदवारी जाहीर होताच भोकर मतदारसंघातील युतीच्या कार्यकर्त्यांनी अर्धापूर येथे फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
दरम्यान, मुखेडमधून प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मुखेडच्या काही भाजप कार्यकर्त्यांनी रामदास पाटील यांना गळ घालत उमेदवारीसाठी तयार केले होते. भाजप आपल्या विद्यमान ३० आमदारांना उमेदवारी देणार नसल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात १२ च विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. त्यात तुषार राठोड यांच्यावर विश्वास टाकत पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.