नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे चार दिवसांपूर्वी मुंबईहून नांदेडला आले होते. काही दिवस ते होम क्वारंटाईन होते. रविवारी सकाळी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर त्यांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पावडेवाडी नाक्याजवळील आशा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. चव्हाण यांची प्रकृती स्थिर असली तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढील उपचार मुंबईतील खासगी रूग्णालयात घेण्याचे ठरले.
हे समजल्यानंतर काँग्रेससह विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांनी आशा हॉस्पिटल गाठले. साहेबांची प्रकृती ठणठणीत होवो, अशी शुभेच्छा व्यक्त केल्या. रविवारी रात्री 'आशा'मध्ये उपचार केल्यानंतर सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या कालावधीत 'कार्डियाक अँम्बुलन्स'ने पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. त्यांच्या तब्येतीची देखभाल करण्यासाठी डॉक्टरही सोबत पाठविण्यात आले. चव्हाण यांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात आल्यानंतर 'आशा हॉस्पिटल' रिकामे करण्यात आले महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे हॉस्पिटलचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर कुलूप लावण्यात आले. केंद्र शासनाच्या नवीन नियमावली नुसार अशा हॉस्पिटल दोन दिवसासाठी बंद ठेवावे लागणार आहे.