नांदेड - रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर यांनी सुधारणा नागरिकत्व कायद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दगडावर पाय ठेवून राजकारण करत आहेत, असे आंबेडकर नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही दगडावर पाय ठेवला आहे. एकीकडे भाजपला दुखावायचे नाही. तर दुसरीकडे काँग्रेसला ही सोडायचे नाही, अशी ठाकरेंची भूमिका असल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली. १ एप्रिलला सीएएच्या अंमलबजावणीच्या वेळेस या सर्व पक्षांची भूमिका उघड होईल, असेही आंबेडकर म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सीएए आणि एनआरसीला घाबरण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाआघाडी सरकार आहे.