नांदेड : अमृतसर जिल्ह्यातील भूमा गावातील रहिवाशी सरदार बरागसिंग हे एक महिना सायकल प्रवास करून नांदेडच्या गुरुद्वाराच्या दर्शनार्थ उपस्थित झाले. विशेष म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांची नांदेडची १३ वी सायकल वारी होय. सरदार बरागसिंग हे दि. १६ जुलै २० रोजी अमृतसर येथून सायकल यात्रा सुरू करत हजूर साहेब नांदेडकडे निघाले होते. लुधियाना, अंबाला, दिल्ली, आगरा, ग्वालियर, इंदौर, बुरहानपूर, हिंगोलीहून जवळपास एक महिन्यानंतर त्यांनी दि. १६ ऑगस्ट रोजी नांदेड गाठले.
गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब आणि गुरुद्वारा लंगरसाहेबचे त्यांनी दर्शन घेतले. चर्चा करत असताना सरदार बरागसिंग म्हणाले, वृद्धापकाळामुळे मला पुढे अशी यात्रा करणे कठीण दिसत आहे. तेव्हा ही माझी शेवटची सायकल यात्रा आहे. मी सायकलवर संपूर्ण देशाची यात्रा केली आहे. सर्व धर्मस्थळांचे दर्शन घेतले. स्वस्थ राहण्याच्या उद्देश्याने सायकल यात्रा घडत गेल्या. पण पुढे शक्यता कमी वाटते. येथून गुरुजींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावी शेती करेन. जर नशिबात पुढे दर्शन करण्याची संधी मिळाली तर पुढच्या वेळी एखादी ट्रक यात्रा जरूर करेन. सरदार बरागसिंग यांना दोन मुलं आणि नातवंडे असून ते गावात शेती करतात.
या शेवटच्या यात्रेत सरदार बरागसिंग यांच्या जवळील पैसे संपले असून यांना आर्थिक मदतीची देखील गरज आहे. शीख समाजातील इच्छुक दानी व्यक्तींनी वयोवृद्ध सरदार बरागसिंग यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन स. रवीन्द्रसिंग मोदी यांनी केले आहे.