नांदेड - किनवट-माहूर राष्ट्रीय महामार्गावरील घोटी येथील पुलाचे काम संथ गतीने चालु आहे. जे काम जून महिन्यापूर्वीच संपायला हवे होते. ते काम ऑगस्ट महिन्यातही पूर्ण होणार नाही, असे चित्र आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पुलाच्या बाजूने पर्यायी पूल बनवला होता. मात्र, जोरदार पाऊस पडल्याने तो वाहून गेला आहे. त्यामुळे माहूर, किनवटसह अर्ध्या तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
या घटनेची माहिती मिळताच नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन, रस्ता लवकरात लवकर पूर्वरत करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे पर्यायी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे तो पावसात वाहून गेल्याची चर्चा परिसरात होत आहे. तालुक्याची सर्व कार्यालय, दवाखाने किनवटला आहेत. आता पुन्हा रस्ता तयार करायला कमीत-कमी चार ते पाच दिवस तरी लागतील. त्यामुळे गावकरी चिंतेत आहेत.