नांदेड - जिल्ह्यात निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई आणि पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे टँकरची संख्या १६२ पर्यंत पोहचली होती. गेल्या आठवड्याभरात पुरेसा पाऊस झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने टँकरची संख्या कमी करत शेवटचे टँकर बुधवारी बंद करण्यात आले. तूर्त तरी जिल्ह्यातील नागरिकांना भीषण टंचाईपासून दिलासा मिळाला आहे.
जमिनीच्या पाण्याची पातळी वाढल्याने विविध ठिकाणी सुरू असलेल्या विहिरी आणि कुपनलिका अशा एकूण ११८३ अधिग्रहण देखील संपुष्टात आणल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक ६५ टँकर मुखेड तालुक्यात सुरू होते. त्या पाठोपाठ लोहा व नांदेड तालुक्याचा क्रमांक होता. मुदखेड, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, माहूर, किनवट तसेच अर्धापूर या १० तालुक्यांमध्ये एकाही टँकरची गरज भासली नाही.
नांदेड तालुक्यात १८, मुखेड तालुक्यात १५, भोकर ३, हदगाव ६, देगलूर ४, नायगाव ४, कंधार ४, उमरी १ असे टँकर ग्रामीण भागात सुरू होते. नगरपरिषद लोहा यांनाही टँकर देण्यात आले होते. एकूण ११८३ अधिग्रहणापैकी तब्बल २०७ अधिग्रहण एकट्या मुखेड तालुक्यात होते. बुधवार अखेर जिल्ह्यात सरासरीच्या ८३ टक्के पाऊस झाला. देगलूर वगळता अन्य तालुक्यात ७० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला. नदी, नाले आणि ओढे वाहत असल्यामुळे प्रशासन पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी दक्ष असल्याचे डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सध्या जरी टँकर बंद झाले असले तरी पाणीटंचाईचा धोका मात्र जिल्ह्याला कायम आहे. जिल्ह्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. अजूनही जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडे आहेत. अशीच पावसाची परिस्थिती राहिली तर भविष्यकाळात मोठ्या टंचाईला समोर जावे लागेल. तूर्त तरी या पाणीटंचाई पासून जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.