नांदेड - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना न्याय देण्यासाठी हे स्थिर सरकार स्थापन झाले असल्याचेही ते म्हणाले.
चिखलीकर पुढे म्हणाले,"पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्या एका महिन्यापासून जे राजकीय नाट्य सुरु होते त्यावर पडदा टाकण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला असतानाही राजकीय पक्षांनी जे महानाट्य सुरु केले होते त्याला कंटाळून अजित पवारांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला पाठिंबा देण्याचा धाडसी निर्णय घेतला"
हेही वाचा - सत्ता स्थापनेबद्दल अजित पवारांना आत्मविश्वास - विनय कोरे
येत्या ३० नोव्हेंबरला विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बहुमत सिध्द करुन महाराष्ट्राला पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देईल. त्यातून राज्याचा विकास, शेतकर्यांचे कल्याण करण्याचे काम या सरकारच्या हातून घडेल, असा विश्वासही चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.