नांदेड - ज्या लोकांना आम्ही पदे दिली, त्याच लोकांनी आम्हाला सोडले. उलट ज्यांना आम्ही काही दिले नाही ते आमच्यासोबत आहेत, असे अजित पवार म्हणाले. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागलेल्या परिस्थितीवर त्यांनी पहिल्यांदा भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज यात्रा बुधवारी नांदेडमध्ये पोहोचली. नांदेड जिल्ह्यातील सारखणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली. राष्ट्रवादीच्या या शिवस्वराज यात्रेला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. सभेत बोलत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबाबत प्रथमच भाष्य केले. ज्या लोकांना आम्ही पदे दिली त्याच लोकांनी आम्हाला सोडले, उलट ज्यांना आम्ही काही दिले नाही ते आमच्या सोबत आहेत, असे म्हणत अजित पवार यांनी निष्ठावंतांचे एकप्रकारे कौतुकच केले.
शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार पुढे म्हणाले की, आतापर्यंत १६ हजार शेतकरी भगिनी विधवा झाल्या आहेत. हे सरकारचे दळभद्री धोरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारचा आणि त्यांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. लाखाचे बारा हजार करणारे हे लोक आहेत. आपले संसार उभे करणारे हे नाहीत, तर ते उद्ध्वस्त करणारे सरकार आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे. त्यामुळे आपल्या विचाराचे सरकार आणायला सहकार्य करा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. पुन्हा एकदा रयतेचे राज्य, शिवस्वराज्य यावे असे साकडे माहुर निवासी रेणुका देवीला घातल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांची समूळ जात नष्ट करण्याचा सरकारचा घाट - धनंजय मुंडे
शिवशाहीचे सरकार म्हणणार्या सरकारला शिवशाहीचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप-सेनेच्या सरकारला खडे बोल सुनावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते, की माझ्या शेतकर्यांच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये. तसे राज्य आपल्याला हवे आहे. म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आल्याचे सांगत शेतकऱ्यांचे सरकार म्हणता मग शेतकर्यांची का फसवणूक करत आहात, असा सवाल त्यांनी केला. शिवाय शेतकऱ्यांची समूळ जातच नष्ट करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. शिवस्वराज्य यात्रा काढल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेच्या मनात परिवर्तन होणार नाही म्हणून ही यात्रा असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
डॉ. अमोल कोल्हे यांनीही या विराट सभेत भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. काम केले तर सांगण्याची गरज भासत नाही. काम केले नाही तर ऊर बडवून सांगावे लागते, अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी अजित पवार, धंनजय मुंडे, अमोल कोल्हे आणि प्रदीप नाईक यांची भाषणे झाली. साडेतीन शक्तीपीठातील एक माहुर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रेच्या तिसर्या दिवसाची सुरुवात करण्यात आली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, माहुरचे आमदार प्रदीप नाईक, आमदार ख्वाजा बेग, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, डॉ. शैलेश मोहिते आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.