नांदेड - सोयाबीनचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी बीबीएफ पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उपविभागामध्ये बीबीएफ तंत्रज्ञान रुंद वरंबा व सरी (बीबीएफ) पद्धतीचा अवलंब करून सोयाबीन या पिकाची लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून सावरगाव (ता.अर्धापूर) येथे गोविंद आबादार यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीबाबत प्रात्यक्षिके आयोजित केले होते. या प्रात्यक्षिकांमध्ये सावरगाव येथील कृषी सहाय्यक सुनील सूर्यवंशी यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन व आंतरपीक तूर याची लागवड कशी करावी, याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
बीबीएफ तंत्रज्ञानामुळे एकरी आठ ते दहा किलो बियाण्याची बचत होते, अवेळी पाऊस व सततचा पावसाचा खंड या कालावधीमध्ये पिकाचे संरक्षण होते. या तंत्रज्ञानामुळे एकावेळी पेरणी, खते देणे व बेड पडण्याचे काम होते. त्यामुळे खर्चामध्ये बचत होते. पेरणी एकसमान झाल्यामुळे पीक जोमदार वाढते पावसाच्या खंडांमध्ये तुषार सिंचनाद्वारे संरक्षित पाणी देण्यासाठी सोयीचे होते. या लागवड पद्धतीचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
या प्रात्यक्षिकाच्या वेळी गावातील प्रगतीशील शेतकरी विनायक आबादार, कृषीमित्र परमेश्वर आबादार, अमोल आबादार, उद्धवराव आबादार, श्रीरंग आंबोरे, गोविंद जाधव, दुलाजी पांचाळ, हरी आबादार, नारायण अंभोरे आदी शेतकऱ्यांनी मागीलवर्षी पेरणी केलेल्या सोयाबीनचे अनुभव सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेती शाळा प्रशिक्षक चांदोजी नवले व समूह सहाय्यक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.प्रत्यक्ष शेतावर खरीप हंगामापूर्वी बीबीएफ लागवडीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.