नांदेड - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांना मदत म्हणून अनेक विद्यापीठांनी परीक्षा शुल्क माफ केले आहे. नांदेड विद्यापीठ मात्र याबाबत टोलवाटोलवी करत आहे. याच्या निषेधार्थ नॅशनल एससी/एसटी/ओबीसी अँड युथ फ्रंट (नसोसवायफ) च्या वतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ पिकांचा बाजार मांडून अनोखे आंदोलन करण्यात आले.
नांदेडसह राज्यातल्या वेगवेगळ्या भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून मुंबई आणि औरंगाबाद विद्यापीठाने ओल्या दुष्काळाची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थ्यांचे सरसकट शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ केले. नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीची तीव्रता लक्षात घेवून नसोसवायएफने स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी पाठपुरावा केला. विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांसह सर्व मंत्र्यांना मंत्रालयातील दालने खाली करण्याचे आदेश
शुल्कमाफीसाठी बुधवारी संघटनेच्यावतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळच पावसामुळे खराब झालेले सोयाबीन, कापसाचे बोंड, सडलेले कांदे, टोमॅटो, मिरची व अन्य पालेभाजांचा बाजार मांडला. यातील सडलेल्या भाजीपाल्यांचा गुच्छ तयार करून कुलगुरुंना भेट देण्यात आला. शुल्क माफीबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नसोसवायएफ संघटनेने दिला आहे.
या आंदोलनात डॉ. हर्षवर्धन दवणे, प्रा. सतीश वागरे, स्वप्नील नरबाग, प्रकाश दीप के, संदीप जोधळे, धम्मा वाढवे, अक्षय कांबळे, सुजय पाटील, शुभम दिग्रसकर, बाळू भाग्यवंत, किरण घोडजकर, गणेश नवघरे, शाहीद शेख, सचिन राजभोज, विष्णू बारसे, शेख जुनेद, गोपाळ वाघमारे यांनी केले.