नांदेड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर नांदेड महानगरपालिका प्रशासनाने काढल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणाचे जिल्हाभरात पडसाद उमटले असून अर्धापूर येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने लोकमाता अहिल्यादेवी होळकर चौकात मनपा प्रशासनाचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
हेही वाचा - शेतातील २५ क्विंटल तुरी जाळल्या; नांदेडच्या हिंगनीमधील घटना
नांदेड महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे बॅनर काढून त्यांची विटंबना केल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बॅनर काढले त्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी भाजपच्यावतीने करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ अर्धापूर येथे मनपा प्रशासनाचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा युवा नेते अँड. किशोर देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, शहराध्यक्ष विलास साबळे, भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष बाबुराव लंगडे, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील कदम, ओबीसी मोर्चाचे प्रदेशसचिव सखाराम क्षीरसागर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले, नांदेडमध्ये भरदिवसा 30 लाख लंपास
त्याचप्रमाणे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्यावतीनेही मनपा प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच बॅनर काढून अपमान करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष तिरुपती भगणुरे, विलास इंगळे, राम शिंदे, बाला पाटील कदम, प्रकाश घोगरे, सुनिल कदम आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.