नांदेड - तीर्थक्षेत्र माहुरमध्ये बंदुकीचे ७३ जिवंत काडतुसे सापडली आहेत. तलावातील गाळ काढण्याचे काम चालू असताना ही काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तलावाच्या १० ते १५ फुट खोलीवर '३ नॉट ३' या बंदुकीची एकुण ७३ जिवंत काडतुसे व १७ तुकडे सापडले आहेत.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ही जिवंत काडतुसे सुरक्षितरीत्या हस्तगत केली आहेत. मागील २० वर्षांपूर्वी या भागात नक्षलवाद्यांचा वावर होता, त्यांनीच ही काडतुसे तलावात लपवून ठेवली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
माहूर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱयांना याबाबत माहिती कळवली असून या काडतुसांचे काय करायचे याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.