नांदेड - मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी पत्रकार परिषदेचे ४२ वे द्वैवार्षिक अधिवेशन यंदा २७ आणि २८ जुलैला नांदेडमध्ये होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली. दोन दिवस चालणार्या या अधिवेशनास देशभरातून २ हजारांवर पत्रकार उपस्थित राहतील, असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांसाठी वैचारिक मेजवाणी असते. २ दिवस चालणार्या या अधिवेशनात मान्यवरांची विविध विषयावरची भाषणे, परिसंवाद, मुलाखती असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले असतात. त्यामुळे अधिवेशन केव्हा आणि कुठे होणार याची उत्सुकता देशभरातील मराठी पत्रकारांना कायम लागलेली असते. यावर्षीचे द्वैवार्षिक अधिवेशन ऐतिहासिक नगरी नांदेड येथे घेण्याचे नक्की झाले आहे. १९९८ मध्ये यापुर्वी परिषदेचे अधिवेशन नांदेडला झाले होते. तब्बल २१ वर्षांनी पुन्हा नांदेडला अधिवेशन होत आहे. अधिवेशन आम्हाला द्यावे, अशी विनंती करणारे शिर्डी, लातूर आणि नांदेड येथील पत्रकार संघाची निमंत्रणे आली होती. त्यापैकी नांदेडची विनंती परिषदेच्या २० मे रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आली.
यापूर्वी अलिकडच्या काळात परिषदेचे अधिवेशन २०११ मध्ये रायगड जिल्हयात रोहा येथे, २०१३ मध्ये औरंगाबाद येथे, २०१५ मध्ये पिंपरी चिंचवड येथे तर २०१७ मध्ये शेगावला झाले होते. यावर्षीचे अधिवेशन नांदेडला होत आहे. रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गे नांदेड देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेलेले असल्याने नांदेडला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगाने लवकरच नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापुरकर यांनी दिली.
देशभरातील जास्तीत जास्त पत्रकारांनी अधिवेशनास उपस्थित राहून नांदेडचे अधिवेशन अविस्मरणीय करावे, अशी विनंती परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, कार्याध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाजन, माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, कोषाध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव विजयकुमार जोशी, प्रमोद माने, उपाध्यक्ष विजय दगडू, शिवराज काटकर तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, परिषद कार्यकारिणी सदस्य रामभाऊ शेवडीकर तसेच अन्य पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.