नांदेड - शीख धर्माचे दहावे गुरू श्री गुरू गोविंदसिंग महाराज यांचा ३५३ वा प्रकाशपर्व तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे श्रद्धा व भक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या जयंती निमित्त ५० हजारांहून जास्त सर्वधर्मीय भाविकांनी गुरुवारी पहाटेपासून गुरुद्वारात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गुरुद्वारातील सर्व धार्मिक विधी जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंजप्यारे साहिबान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
प्रकाशपर्वानिमित्त सकाळी श्री गुरुग्रंथ साहेब यांचा हुकुमनामा पठण करण्यात आला. त्यानंतर अरदास करून श्री गुरु गोविंदसिंग यांना अभिवादन करण्यात आले. गुरुद्वाऱ्यात श्री गुरू गोविंदसिंह यांच्या अवतार धारण करण्याच्या घटनेविषयी कथा आणि कीर्तन करण्यात आले. प्रकाशपर्वाचे औचित्य साधून गुरुद्वाऱ्याच्या इमारतीवर रंगीत रोषणाई करण्यात आली होती. तसेच इमारतीच्या आतील भागात फुलांची सजावट करण्यात आली होती. सेवाभावी समूहांनी भाविकांना लंगर प्रसाद वाटून आनंद व्यक्त केला.
हेही वाचा - 'अजिंठा एक्सप्रेस'ची वेळ बदलण्याचा निर्णय मागे; पूर्वीप्रमाणेच असेल वेळ
या कार्यक्रमानिमित्ताने गुरुद्वारा सचखंड बोर्डाने भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावेळी गुरुद्वारा बोर्डचे सचिव रवींद्रसिंग बुंगाई, वरिष्ठ सदस्य गुरुचरणसिंग घडीसाज, गुरमीतसिंग महाजन, मनप्रीतसिंग कुंजीवाले, सरदुलसिंग फौजी, जगबीरसिंग शाहू, भागिंदरसिंग घडीसाज, गुरुद्वारा बोर्डचे अधीक्षक गुरविंदरसिंग वाधवा, डी.पी. सिंग चावला, रंजितसिंग चिरागीया, ठाणसिंग बुनाई, नारायणसिंग नंबरदार, हरजीतसिंग कडेवाले, रविंदरसिंग कपूर यांनी मोलाचे योगदान दिले.
हेही वाचा - सिडको परिसरात चोरट्यांचा डल्ला, दोन लाखांचा ऐवज केला लंपास