नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासकीय रुग्णालयात दोनशे खाटा वाढविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय असला तरी या यात जनतेच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी विविध उपाययोजनांसह नागरिकांना आवाहनही केले जात आहे. आरोग्य सुविधेच्या दृष्टिने जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांपर्यंत एक उत्तम व्यवस्था असल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले.
नियोजन बैठक संपन्न
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता दिलीप म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर आदिंची उपस्थिती होती.
स्वयंशिस्त व उपचार घेणे यातच सर्वांचे हित
कोरोनासदृश्य आजार असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांनी काळजी, स्वयंशिस्त व उपचार घेणे यातच सर्वांचे हित आहे. केवळ भितीपोटी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे आग्रह धरला नाही, तर स्वाभाविकच जे खरे गरजू आहेत त्या कोरोना रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा पोहचविणे रुग्णालय व्यवस्थापनाला शक्य होईल असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आरोग्यासाठी निधीची कमतरता नाही
गेल्या काही दिवसांपासून दिवसाला एक हजारहून अधिक बाधित समोर येत असून बरे होऊन घरी जाणाऱ्यांचेही प्रमाणही अधिक आहे. ज्यांना लक्षणे नाहीत व जे बाधित गोळ्या, औषधातून बरे होणारे आहेत अशा असिम्टोमॅटिक व्यक्तींसाठी आपण महसूल भवन आणि एनआरआय कोविड केअर सेंटर टप्प्या-टप्प्याने वाढवित आहोत. जिल्हा रुग्णालयात 60 ते 70 बेड्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 70 ते 120 बेड्स तर खाजगी दवाखान्यात जवळपास 20 ते 30 बेड्स वाढविले जात आहे. आरोग्यासाठी निधीची कमतरता नाही. जिल्याला अतिरिक्त निधी कसा उपलब्ध होईल यादृष्टीने आम्ही नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
कधी-कधी कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त
कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची टिम वर्षभर राबते आहे. सर्वजण मेहनत घेत आहेत. प्रशासनाच्या या अखंड सुरु असलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला जनतेनेही आता सहकार्य वाढविले पाहिजे. भाजीपाला दारावर घेतला पाहिजे. बाहेर विनाकारण गर्दी करणे टाळले पाहिजे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. यात ज्यांचे पोट हातावर आहे. त्यांच्या रोजगाराची जाणीव आम्हाला आहे. मात्र जिल्ह्यातील आजची कोरोनाची स्थिती लक्षात घेता काही कठोर निर्णय घेणे जिल्हा प्रशासनाला केंव्हा-केंव्हा क्रमप्राप्त ठरते असेही त्यांनी स्पष्ट केले.