नांदेड - लॉकडाऊन सुरू असताना देखील स्थलांतर थांबलेले नाही. प्रशासन आहे त्याच जागी थांबण्याचे आवाहन करत असताना लोक संचारबंदीचे वारंवार उल्लंघन करत आहेत. असाच एक प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. 18 विद्यार्थ्यांनी टँकरमध्ये बसून जालना ते नांदेड असा जीवघेणा प्रवास केल्याचे उघडकीस आले.
नांदेड पोलिस गस्त घालत असताना ही घटना उघडकीस आली आहे. तेलंगाणा राज्यातील हे विद्यार्थी जालन्यात कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होते. गाठीस असलेले पैसे संपल्याने त्यांची उपासमार होत होती. त्यामुळे हा निर्यण घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
या 18 विद्यार्थ्यांत 16 मुले आणि 2 मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यासह टँकरच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेऊन सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. जालना ते नांदेड असा टँकरने प्रवास केल्यानंतर नांदेडहून तेलंगणात पायीच जाण्याचा त्यांचा विचार होता.