नांदेड- इंडोनेशिया येथून धर्म प्रसारासाठी आलेल्या धर्मगुरुसह इतरांवर पोलीसांनी कारवाई करु नये. या मागणीसाठी रविवारी रात्री इतवारा पोलीस ठाण्यासमोर बेकायदेशीररित्या मोठा जमाव जमला होता. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी फौजफाट्यासह दाखल होताच जमाव परत गेला.
हेही वाचा- लॉकडाऊन : 80 वर्षाच्या आजीची तब्बल 3 दिवस पायपीट, चालल्या 'इतके' अंतर
पोलीसांना मिळालेल्या माहितीवरुन, मरकझच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १४ लोकांना पोलिसांनी शोधून उपचारासाठी दाखल केले होते. त्या सर्वांच्या स्वॅबचे नमूने घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या झाडाझडतीत इतवारा भागातील एका प्रार्थना स्थळात इंडोनेशिया येथून आलेल्या एका धर्मगुरुसह १२ जणांना प्रशासनाने शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. धर्मगुरु हे आपल्या सहकाऱ्यांसह धर्मप्रसारासाठी आले होते.
प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होवू नये. तसेच निजामोद्दीन येथे मरकझच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगी जमातीच्या लोकांना प्रशासनाने ताब्यात घेवू नये. यासाठी इतवारा पोलीस ठाण्यासमोर रविवारी रात्री ११.३० ते १२ च्या सुमारास मोठा जमाव जमला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असताना, एवढा मोठा जमाव जमला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी फौजफाट्यासह दाखल झाले. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी संचारबंदी लागू असल्याचे सांगून बेकायदेशीर जमावातील लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर जमावातील लोक पांगले.
बेकायदेशीर जमाव एकत्र जमविल्या प्रकरणी सहाय्यक फौजदार डहाके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन काही जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री ठाण्यासमोर जमाव एकत्र करण्याच्या पाठीमागे कोणाचे डोके होते? याचा शोध घेणे आवश्यक आहे. बेकायदेशीर जमावा संदर्भात सोशल मिडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटून जिल्हा प्रशासना विरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.