नांदेड - मागच्या वर्षी झालेल्या पावसाने ११ तालुक्यातील वार्षिक सरासरी ओलांडली होती. ऑक्टोबर अखेरपर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम होता. त्यामुळे या उन्हाळ्यात अनेक वर्षांच्या तुलनेत कमी पाणीटंचाई जाणवली. त्यामुळे जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी १२ तालुके टँकरमुक्त असून केवळ चार तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या १३ टँकरच्या २९ फेऱ्या करुन या चार तालुक्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
दरवर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाला टंचाई आराखडे तयार करावे लागतात. जानेवारीपासून जिल्ह्यातील १६ तालुक्यांतर्गत असलेल्या विविध ठिकाणच्या वाडी-तांड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असतो. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी ११ तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढली होती. परिणामी नांदेड जिल्ह्यात या वर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली नाही.
बारा तालुके झाले टँकरमुक्त -
नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या परिस्थिती संदर्भात जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा अहवाल दिला आहे. या अहवालात जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज नाही असे सांगण्यात आले आहे. अर्धापूर, भोकर, मुदखेड, लोहा, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी, हदगाव, हिमायतनगर, माहूरचा समावेश आहे.
चार तालुक्यात टँकर सुरू -
नांदेड -१, कंधार-४, मुखेड-७, किनवट-२ अशा चार तालुक्यांमध्ये १३ टँकरच्या २९ फेऱ्याकरुन पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वात जास्त टँकर मुखेड तालुक्यात असल्याची नोंद शासन दप्तरी आहे. दरम्यान, वैशाख महिना संपूर्ण ज्येष्ठ महिना लागला आहे. मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.