मुंबई - दहशतवादी कारवायांप्रकरणी नांदेडमधील तिघांना 10 वर्षांची शिक्षा, तर दोघांची पुरव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2012च्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
राज्यातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 2012मध्ये नांदेडमधून मोहम्मद अक्रम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक, मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास या पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला. देशात अशांतता निर्माण करून हिंदू नेते तसेच बड्या पत्रकरांना जीवे मारण्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोप आरोपींवर होता.
हेही वाचा - कुबेरांचे पुस्तक पुरंदरेंचा इंग्रजी अवतार; श्रीमंत कोकाटेंनी केली बंदी घालण्याची मागणी
10 वर्षांची शिक्षा -
न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी ह्या प्रकरणावर सुनावणी पूर्ण केली. त्याप्रमाणे, मोहम्मद अक्रम , मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक यांना बेकायदेशीर कृती प्रतिबंधक अधिनियम (युएपीए) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा ठोठावली.
एनआयएनच्या आरोपांनुसार, अक्रम रोजगाराचे कारण सांगून सौदी अरेबियाला गेला आणि तेथे वास्तव्य करून तो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांच्या संपर्कात आला. सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये अक्रमने त्याच्या साथीदारांसह नांदेड, हैदराबाद आणि बेंगळूरुसह भारतातील विविध भागातील प्रमुख हिंदू नेते, ज्येष्ठ पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, ह्या कटाला पूर्णत्वास नेण्याआधी ह्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.