नागपूर - सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीबाबत सोशल मीडिया व नागपूरकरांमधे नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरात युवा सेनाकडून अप्पर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना पोस्टाने पत्र पाठविण्यात आलं आहे. यात मुंढेंची बदली तात्काळ थांबवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. शिवाय अशा कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची नागपूराला गरज असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदली बाबत सर्वत्र चर्चा सुरू होत्या. या चर्चांना काल (ता २६ बुधवार) पूर्णविराम मिळाला. आयुक्त मुंढे यांची मुंबई येथे बदलीचे आदेश आले आणि सोशल मीडिया व सर्वसामान्य नागपूरकरांमधे बदली बाबत नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. अशातच आता मुंढे यांची बदली थांबवावी यासाठी आंदोलनांना सुरूवात झाली आहे.
नागपूरात युवा सेवा व आम आदमी पार्टीच्या वतीने मुंढेच्या बदलीला विरोध करण्यात आला. युवा सेनेकडून अप्पर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना पत्र लिहून मुंढेची बदली थांबवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. शिवाय कोरोनाच्या काळात नागपूरात कोरोना फोफावत असताना एका कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची बदली, नागपूरकरांसाठी अधिकच गंभीर बाब असल्याचेही युवा सेनेकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर मुंढे आयुक्त म्हणून चांगली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांची बदली थांबवा अन्यथा युवा सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा युवा सेनेकडून देण्यात आला आहे.
दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या वतीनेही संविधान चौकात मुंढेच्या समर्थनार्थ आंदोलन करत मुंढेची बदली थांबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी 'कोविड-१९ च्या काळात आमचे परिवार मुंढे तुमच्यामुळे सुरक्षित आहेत' अशा आशयाचे फलक दर्शवत आंदोलकांनी हे आंदोलन केले. दरम्यान, मुंढे यांच्या बदलीवरून आता विविध राजकीय पक्ष व नागपूरकरांमधे नाराजीचे सूर पहायला मिळत आहे. शिवाय सोशल मीडियावरही मुंढेच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर होताना पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा - तुकाराम मुंढेंच्या अनुभवाइतक्या झाल्या बदल्या, वाचा नागपुरातून कशी झाली उचलबांगडी
हेही वाचा - धनदांडग्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे लुटणाऱ्या टोळीतील तिघांना अटक