नागपूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे महाराष्ट्रात चित्रीकरण आणि प्रदर्शन होऊ देणार नसल्याची भूमिका जाहीर केल्याने नागपूर ग्रामीण काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यूथ काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांची पोस्टर्स हातात घेऊन निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचा निषेध व्यक्त करत अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी, महागाईविरोधात अमिताभ, अक्षयने ट्वीट करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर कधीकाळी ट्वीटच्या माध्यमातून तत्कालीन केंद्र सरकारवर गंभीर आरोप करणारे अभिनेते आता पेट्रोलचे दर शंभरीच्या पुढे गेल्यानंतरही गप्प का बसले आहेत, असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण आणि प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यावरून राजकारण तापायला सुरवात झाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
देशात २००४ ते २०१४ या काळात संपुआचे सरकार अस्तित्वात होती. त्यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते मनमोहन सिंग पंतप्रधान होते. या काळात इंधनाचे दर भडकले असताना भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन केले जात असताना अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला इंधन दरवाढीच्या विरोधात जाब विचारला होता. आता पेट्रोले दर १०० रुपयांच्या वर गेले असतानादेखील दोन्ही अभिनेते गप्प असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील जाहीर सभेत बोलताना अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, 'सातत्याने ट्विटरवर टिवटिव करणारे हे अभिनेते आता कुठे गेले?' महाराष्ट्रात त्यांच्या चित्रपट आणि चित्रीकरणावर बंदी आणणार असल्याचा इशाराही काँग्रेसच्या वतीने पटोले यांनी दिला होता.