नागपूर - राजस्थान येथून नागपुरात राहणाऱ्या मैत्रिणीकडे पाहुणी म्हणून आलेल्या तरुणीला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्काराचा आरोप मैत्रिणीच्या नवऱ्यावर झाला आहे. जुनेद खान, असे आरोपीचे नाव आहे.
या घृणास्पद कृत्यात पीडित तरुणीची मैत्रिण जरीन खान हिने सुद्धा साथ दिल्याची तक्रार शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे. शिवाय या प्रकरणात आरोपीचा सोनू नामक मित्र देखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तीन आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी जुनेद खान हा पळून जाण्यात यशस्वी झाला.
हेही वाचा - महिला उमेदवार विजयी झाल्याचा आनंद; घोड्यावरून काढली मिरवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही १६ जानेवारीला राजस्थानवरून नागपूरला आपल्या मैत्रिणीकडे आली होती. पीडित तरुणीला नागपुरातील संपत्ती विकायची होती. त्यामुळे, रात्रीच्या मुक्कामाला ती मैत्रिणीच्या घरी थांबली होती. पीडित तरुणी दुसऱ्या खोलीमध्ये झोपली असताना जरीनचा नवरा तिच्या खोलीत शिरला. आपल्या जवळ कुणी आल्याचा भास झाल्याने ती तरुणी जागी झाली तेव्हा आरोपीने चाकूचा धाक दाखवून पीडितेवर तीन वेळा बलात्कार केला. पीडित तरुणीने याला विरोध करत ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीच्या मित्राने जोरात गाणे वाजवून तिचा आवाज खोलीच्या बाहेर जाणार नाही या करिता प्रयत्न केला. कर्कश गाण्याच्या आवाजामुळे आरोपीची पत्नी जरीन जागी झाली तेव्हा पीडित तरुणीने सर्व आपबीती तिला सांगितली. तेव्हा घटनेची वाच्यता कुठे केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धकमी जरीनने पीडितेला दिली.
पीडित तरुणीने आरोपींविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी जरीन खान आणि सोनू नामक आरोपीला अटक केली आहे, तर मुख्य आरोपी जुनेद खान हा पळून गेल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मुख्य आरोपीवर अनेक गुन्ह्यांची नोंद
या प्रकरणातील मुख्य आरोपी जुनेद खान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तो सध्या पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करत होता, मात्र आपली दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तो अधेमधे गंभीर गुन्हे करत असल्याची माहिती पुढे आली.
हेही वाचा - नागपूर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव