नागपूर - जगभरात व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांना मानाचे स्थान आहे. ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय समाजावरही व्यंगचित्राचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. बाळासाहेब ठाकरे व आर. के. लक्ष्मण यांच्यामुळे महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांना जागतिक ओळख प्राप्त झाली आहे, असे मत विदर्भ कार्टूनिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंगचित्रकार संजय मोरे यांनी मांडले आहे.
व्यंगचित्रकारांचा गौरव करताना कोणत्याही व्यंगचित्रकाराचे एखादे व्यंगचित्र श्रेष्ठ आणि इतर सुमार, असे म्हणता येत नाही. देशात आणि महाराष्ट्रात अनेक व्यंगचित्रकार होऊन गेले आहेत. नवीन पिढीतही उत्तम व्यंगचित्रकार आहेत. समाजाच्या दैनंदिन घडामोडीतील, जीवनातील विविधांगी पदर तटस्थपणे उलगडून दाखविण्याचे काम व्यंगचित्रकार करत असतो. कधी हास्य तर कधी गंभीरता धारण केलेले व्यंगचित्र समाजजीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळेच व्यंगचित्रांना 'समाजाचा आरसा' म्हटले जाते. शब्दबंबाळ नसलेली, वाचकांच्या मनातील मूर्त-अमूर्त कल्पनांना साकारणारी व्यंगचित्रे रसिकांच्या लवकर पसंतीस उतरतात.
व्यंगचित्र म्हटले की सर्वांना हसविणारे, चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, व्यंगचित्र हे चाललेल्या घटना त्यातून होणारी जनजागृती यासाठी फार महत्त्वपूर्ण असतात. डेव्हिड लो नावाचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. ते हुकूमशहा हिटलर यांचे व्यंगचित्र रेखाटत असत. त्यांचा प्रभाव हा भारतातील व्यंगचित्रकांवर पडला.