नागपूर - जगलेल्या आयुष्याचा सर्वाधीक काळ ज्या महाराष्ट्राच्या मातीत घालवला, त्या मराठी भाषेला आणखी उन्नत करण्यासाठी एका बंगाली महिलेने पुढाकार घेतला आहे. त्या महिलेने तब्बल 19 वर्षांचे जीवन खर्ची घातले आहे. मराठी भाषेचा गंध नसलेल्या मंदिरा गांगुली यांनी 20 हजार बंगाली शब्दांचा मराठी शब्दकोष तयार करून महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडले आहे.
मंदिरा गांगुली या आज 61 वर्षांच्या असून, त्यांनी जीवनातील 41 वर्ष महाराष्ट्रात घालवले आहेत. त्यांनी इथले संस्कार, चाली-रीती आणि बोलीभाषांचा खुल्या मनाने स्वीकार केला आहे. मराठी माणसाला बंगाली रोसगुलापेक्षाही गोड भेट द्यावी, या सेवाभावी भावनेतून त्यांनी 20 हजार बंगाली शब्दांचा मराठी शब्दकोष तयार केला आहे.
मंदिरा स्वप्नकुमार गांगुली या नावाच्या सभोवताली आता मराठी किंबहुना महाराष्ट्रीयन बंगाली असण्याचे वलय निर्माण झाले आहे. मंदिरा वयाच्या 19 व्या वर्षी म्हणजेच 1979 साली लग्न होऊन महाराष्ट्रात राहायला आल्या. बंगाली भाषेशिवाय जगात दुसरी देखील भाषा अस्तित्वात आहे, याची कल्पना देखील त्यांना नव्हती. मराठी आणि हिंदी भाषेचा साधा गंधही त्यांना नव्हता, केवळ बंगाली भाषेचा अभिमान बाळगून त्या भंडारा येथे राहायला आल्या. इथे आल्यावर सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अतिशय कठीण गेला. बंगाली आणि मराठी भाषेचा दूरपर्यंत संबंध नसल्याने मंदिरा यांना जीवनाआवश्यक वस्तू विकत घेतानासुद्धा तारेवरची कसरत करावी लागली. मात्र, शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबातील महिलांनी त्यांना समजून घेतलं. एवढंच काय तर आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांच्यावर मराठी संस्कार देखील केले. म्हणूनच आज मंदिरा गांगुली मराठी भाषेचे ऋण फेडत असल्याच्या भावना बोलून दाखवत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या बंगाली असल्या तरी त्यांचे शालेय शिक्षण आसाम येथील गुवाहाटी येथे झाले. वडील रेल्वेत नौकरीला असल्याने त्यांना गुवाहाटी येथेच राहून शिक्षण घ्यावे लागले, पण त्यांना आसामी भाषा बोलता किंवा लिहिता वाचता देखील येत नाही.
हेही वाचा - महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'
1991 साली मुलीच्या शिक्षणासाठी त्या भंडारा येथून नागपूरला स्थलांतरित झाल्या आणि इथेच त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले. नागपूरला राहायला आल्यानंतर मंदिरा या निखिल भारत बांगो साहित्य संमेलन या संस्थेसोबत जोडल्या गेल्या. बंगाली भाषा रसोगुल्लामाणे रसाळ असल्याने अनेक मराठी लोकं त्या संस्थेत त्यांच्याकडे बंगाली भाषा शिकायला येतात. त्यांच्या मदतीला असलेल्या मराठी शिक्षकांनी त्यांच्याकडे बंगाली भाषेचा मराठी शब्दकोश तयार करण्याचा आग्रह धरल्यामुळेच त्यांनी 14 एप्रिल 2014 साली बंगाली शब्दांचा मराठी शब्दकोष तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. 14 एप्रिल हा दिवस त्यांच्या आठवणीत राहिला कारण त्या दिवशी बंगाली नवीन वर्षाला सुरुवात होते. तब्बल 7 वर्ष दिवस-रात्र एक करून त्यांनी आज 20 हजार बंगाली शब्दांचा मराठी शब्दकोष तयार केलेला आहे. मंदिरा यांच्या या कार्यात त्याचे पती स्वप्नकुमार गांगुली आणि आई यांनी मोलाची साथ दिली. शिवाय सहयोगी शिक्षिका मीनल जोशी, प्रमोदीनी तांबोस, डॉक्टर बिना, डॉक्टर माधवी भट यांच्या नावाच्या उल्लेख केल्याशिवाय त्याचे हे कार्य पुर्णत्वास गेले नसते असं देखील मंदिरा अभिमानाने सांगतात.
अतिशय कठीण वाटणारी मराठी भाषा शिकताना त्यांनी मराठी भाषेला आणि अनेक लोकांना जवळून अनुभवले. जगात कोठेही सापडणार नाहीत, इतके प्रेमळ आणि आपले-आपलेसे वाटणारे लोक इथे राहतात. हे त्यांनी आवर्जून सांगितले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंदिरा गांगुली यांनी मराठी भाषेसाठी केलेल्या अनमोल कार्याची दखल घेलती आहे.