नागपूर - शहरात सध्या सगळीकडे पूल आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, अर्धवट बांधकामामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नागपूरातील पारडी भागात आज (बुधवार) खड्ड्यामुळे अपघात होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही महिला दुचाकीवरून जात असताना खड्ड्यामुळे तिचा तोल गेला. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने महिलेला चिरडले. या घटनेला वाहतूक पोलीसही जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अनुसया पांडुरंग ढोरे (५० वर्ष) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून रस्त्यांच्या अर्धवट बांधकामावरून रोष व्यक्त केल्या जात आहे. शिवाय मृत महिलेच्या नातेवाइकांकडूनही प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा संताप व्यक्त करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पारडी परिसरातील पुलाचे बांधकाम सुरू आहेत. मात्र बांधकाम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्तेही पूर्णतः खराब झाल्याचे चित्र आहे. अशातच या खराब रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पारडी भागातील पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार ? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सोबतच हा भाग वर्दळीचा असल्याचे या रस्त्यांवर कायम स्वरूपी पोलीस नेमण्यात यावेत. जेणेकरून अपघात होऊन सामान्य नागरिकांचे जीव जाणार नाही, अशी मागणी नागरिकांची आहे.