नागपूर - शहरातील पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. पाणी नसल्याने चित्रकला महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना चक्क स्वगावी पलायन करावे लागत असल्याचे समोर आले आहे. वसतिगृहात पिण्यासाठीही पाणी नसल्याने या विद्यार्थिंनींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.
नागपूरकर सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जल साठ्यांमध्ये पाणी नाही. परिणामी शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे याचा फटका शहरवासियांसोबतच वसतिगृहातील विद्यार्थिनींनाही बसत आहे. पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी महाविद्यालय सोडून घरी जाणेच पसंत केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
चित्रकला महाविद्यालयातील वसतिगृहात एकूण ५० विद्यार्थी राहतात. मात्र या विद्यार्थिनींना पुरेल इतके पाणी पुरविले जात नाही. महानगरपालिकेला वसतीगृह प्रशासनाने पाण्याच्या टँकरची वारंवार मागणी केली. मात्र मनपाच्या दुर्लक्ष केल्यामुळे मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पाणी नसल्याने स्वच्छतागृहांचीही अवस्था वाईट आहे. स्वच्छतेअभावी रोगराई पसरू नये तसेच, पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे अभ्यास सोडून विद्यार्थिनींनी स्वतःचे घर गाठणेच पसंत केले आहे.