नागपूर - गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील तोतलाडोह आणि नवेगाव खैरी या दोन धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. सावधगिरी म्हणून नवेगाव खैरी धरणाचे सर्व 16 दार शनिवारी रात्रीपासून 0.30 मीटरने उघडले असून त्यातून 550 क्यूमेक एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
तसेच तोतलाडोह धरणाचे 14 दार ही प्रत्येकी 0.30 मीटरने उघडले असून त्यातून 685 क्यूमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभराकरिता सुटलेला आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या जलाशयातील पाणी आधीच मुबलक प्रमाणात शिल्लक होता. त्यात काही दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दोन्ही धरण शंभर टक्के भरले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नवेगाव खैरी आणि तोतलाढोह धरणातून पाण्याच्या विसर्ग केला जात आहे.