नागपूर - इतिहासात पहिल्यांदाच नागपूर शहरावर पाणीकपातीची नामुष्की आली आहे. मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही समस्या उद्भवली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर मटका फोड आंदोलन केले. भर पावसाळ्यात शहरावर जलसंकट कोसळल्याने महानगरपालिकेने योग्य वेळेस योग्य उपाययोजना केल्या नाहीत. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.
जुलै महिना संपत आला तरी राज्याच्या बऱयाचशा भागात पाऊस झालेला नाही. जलाशय आणि विहिरींनी तळ गाठला आहे. तलावातील पाणीसाठा संपत आला असल्याने जलसंकटावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाचे सांगितले.
शहरात पाणी कपात होणार नाही असं छातीठोक पणे सांगणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती आणलीच कशी? असा प्रश्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत होते.