नागपूर - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाच्या बाजूला जलसंधारणाची कामे केली, त्याचा चांगला फायदा झाला. त्यामुळे हा प्रयोग देशभरात राबवणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते इंडियन बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते.
राज्यासह देशभरात पावसाची टक्केवारी घटलेली आहे. एवढेच काय तर नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जलसंधारणाची गरज आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
पावसाच्या पाण्याला म्हणजेच धावणाऱ्या पाण्याला चालायला लावले पाहिजे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावले पाहिजे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरवायला शिकले पाहिजे. यामुळे पाण्याची पातळी वाढेल, यातून जलसंकटासारख्या प्रश्नावर तोडगा निघेल, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.