नागपूर - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झालेल्या जळीतकांडातील पीडितेने आज (सोमवारी) सकाळी अखेरचा श्वास घेतला. यानंतर शवविच्छेदनाकरीता तिचा मृतदेह ऑरेंज सिटी रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आला. यानंतर वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. पीडितेला जो त्रास झाला आहे, ज्या वेदना तिने सहन केल्या त्याच वेदना त्या नराधमाला देण्यात याव्या. त्यालासुद्धा त्याठिकाणी पेटवा, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईंकांनी यावेळी केली.
दरम्यान, गृहमंत्री यांनी देखील पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. याप्रकरणात दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'जीवनाच्या लढाईत तू हरलीस तरी न्यायाच्या लढाईत महाराष्ट्र तुझ्यासोबत'
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज (सोमवारी) आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.