पुणे - पुण्यात भिंत कोसळून १५ बांधकाम मजूरांचा मृत्यू झाला. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ही जागा कुणाची होती, त्याचा वापर काय होता, अशा सर्व बाबींची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु, असे ते म्हणाले. शिवाय सर्व मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. मृतदेह विमानाने त्यांच्या घरी पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा मलबा पडला. यावेळी मजूर झोपेत असल्याने भिंतीच्या मलब्याखाली दबले. यामध्ये १५ कामगारांचा मृत्यू झाला. तर ३ कामगारांना जीवंत बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना यश आले आहे.