नागपूर- गेल्या 3 दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील गाव खेड्यातले नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे उमरेड तालुक्यातील बेला गावाजवळून वाहणाऱ्या नांद नदीला आलेल्या पूराचे पाणी गावात शिरले आहे. या पुराच्या पाण्याने येथील एका कंपनीलाही वेढा घातला असल्याने या कंपनीत काही कर्मचारी अडकले आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
संततधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नांद नदी दुथडी भरून वाहते आहे. त्यामुळे या नदीवरीस बंधाऱ्यांचे दरवाजे सिंचन विभागानं उघडल्यामुळे नांद गावात पुरस्थिती निर्माण झाली आहे. या गावालगत असलेल्या एव्हीवेट न्यूट्रिशन या कंपलीतील 15 कामगार मंगळवारपासून कंपनीमधच अडकून पडले आहेत. या कंपनीतील 300 गाई सुद्धा पाण्यात अडकल्या आहेत.
या पुराची माहिती मिळताच जिल्ह्याधिकाऱ्यांनी तातडीने NDRF च्या पथकाला पूरस्थळी पाचारण केले आहे. तसेच आता पाऊस थांबला असुन, पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. तत्पुर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदतकार्याला सुरुवात केली आहे. सिंचन विभागाने नांद नदीवरील बंधाऱयांचे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं जाईल, असा अंदाज आहे.