नागपूर - विजेच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर ताण पडत असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. या दरवाढीच्या निषेध करत विदर्भ राज्य समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी राम नेवले यांच्या नेतृत्वात वीज बिलाची होळी केली. विशेष म्हणजे हे आंदोलन नागपूरसह विदर्भातील प्रत्येक तालुक्यातील वीज वितरण कार्यालयाच्या बाहेर करण्यात आले.
राज्यात तयार होत असलेल्या विजेच्या एकूण टक्केवारी पैकी 70 टक्के विजेची निर्मिती ही विदर्भात होते. त्याकरीता विदर्भातील जमीन, पाणी आणि कोळशाचा उपयोग केला जातो. मात्र त्याच्या मोबदल्यात विदर्भाच्या नागरिकांना धूळ, प्रदूषण आणि अवाढव्य आणि अवाजवी वीज बिलांचा भेट दिली जात आहे. एवढंच नाही तर ज्या विदर्भात विजेची सर्वाधिक निर्मिती केली जाते, त्या विदर्भातील शेतकऱ्यांना 12 तास लोडशेडिंगचे चटके सहन करावे लागत असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून करण्यात आला आहे.
ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या घराला घेराव घालणार-
या विरोधात आज विदर्भातील प्रत्येक तालुक्यात असलेल्या एमएसईबी ( महावितरण) कार्यालयाबाहेर प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी वीज बिलांची होळी सुद्धा केली. देशाच्या इतर राज्यात विजचे दर कमी असताना आपल्या राज्यातच विजेचे दर इतके का वाढलेले आहेत, असा प्रश्न करत आंदोलकांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. यानंतर पुढच्या टप्प्यात ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या घराला घेराव घालणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते राम नेवले यांनी दिली आहे.