नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा पोलीस प्रयत्न करत असताना काही संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाचे युवानेते वरूण सरदेसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात खरा सूत्रधार आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे हा आहे. ते नागपुरात माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाले वरुण सरदेसाई : वरूण सरदेसाई म्हणाले की, मला जेवढी माहिती मिळाली आहे, त्यानुसार व्हिडीओमध्ये दिसत असलेले आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे संपूर्ण प्रकरणाच्या मागील सूत्रधार आहेत. राज सुर्वे यानेच संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केला होता. त्यामुळे प्रकरणी पोलिसांनी राज सुर्वेला अटक केली पाहिजे, असे वरुण सरदेसाई म्हणाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तळाशी जाण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे, असे देखील ते म्हणाले आहेत.
वरूण सरदेसाईंचा गौप्यस्फोट : संपूर्ण व्हिडिओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवला आहे असा दावाही सरदेसाई यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना खरा व्हिडीओ समोर आला पाहिजे, अशी मागणी वरुण सरदेसाईंनी केली आहे.
म्हणून भाजपला पराभवाचे धक्के : जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम आहे. त्यांच्यावर रोज आरोप केले जात आहेत. तसेच कारवाया देखील केल्या जात आहेत. सध्या केंद्र सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया करत आहे. मात्र, ते नेते भाजपमध्ये गेले त्यांच्यावर कारवाया थांबवल्या जात आहेत. जनता हे सगळे पाहत आहे. जनतेला हे रुचलेले नाही आणि त्यामुळेच ठिकठिकाणी भाजपचा स्वतःच्या गडामध्येच पराभव होत असल्याचेही वरूण सरदेसाई म्हणाले.
या निवडणूका लढवणार : ज्या पद्धतीने भाजपचा ठीकठिकाणी पराभव होत आहे. त्यामुळे नागपूर मनपाच्या निवडणुकीमध्ये ही काय होईल हे सुस्पष्ट असल्याचे सरदेसाई म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेली अनेक वर्षे एका विशिष्ट विचारसरणीचा कब्जा आहे. आम्ही कधीही इथल्या सिनेट निवडणुकीला गांभीर्याने घेतलेले नाही. मात्र, आता आम्ही सिनेटच्या दहा जागांपैकी तीन जागांवर निवडणूक लढवत आहोत. त्या तीन जागा आणि उर्वरित सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास वरून सरदेसाईंनी व्यक्त केला आहे.