नागपूर : पूर्व नागपूरच्या दर्शन कॉलनी येथील मैदानावर महाविकास आघाडीकडून वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात येत आहे. हे मैदान खेळाचे मैदान आहे, त्यामुळं राजकीय सभेसाठी हे मैदान अजिबात देऊ नका अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. वज्रमुठ सभे विरोधात दर्शन कॉलनीत राहणाऱ्या स्थानिक लोकांनी मैदानाच्या शेजारी मैदान बचाव आंदोलन सुरू केले आहे. तसेच आज हनुमान चालीसाचे पठण करत आंदोलकांनी महाविकास आघाडीचा प्रतिकात्मक पुतळा ही जाळला आहे.
१६ एप्रिलला नागपुरात वज्रमुठ सभा : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा ही १६ एप्रिलला नागपुरात होणार आहे. सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. वज्रमुठ सभेसाठी पूर्व नागपुर येथील दर्शन कॉलनीतील खेळाचे मैदानाची निवड करण्यात आली असून नागपूर सुधार प्रन्यासने मैदानाची परवानगी देखील दिली आहे. आता नागपूर सुधार प्रन्यासने दिलेल्या परवानगीवर भाजपने आक्षेप घेतला असून ही परवानगी रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे.
राजकीय विरोधात स्थानिकांची उडी : भारतीय जनता पक्षाचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडेनी दर्शन कॉलनीतील खेळाच्या मैदानावर वज्रमुठ सभा नको असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर आता स्थानिक नागरिकांनी देखील कृष्णा खोपडे यांना भूमिकेला पाठिंबा देत महाविकास आघाडी विरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. आज महाविकास आघाडीचा पुतळा जाळून हनुमान चाळीसाचे पठन केले आहे. त्यामुळे आता हा विषय राजकीय सोबतचं सामाजिक देखील झाला आहे.
दर्शन कॉलनी मैदानावरचं होईल सभा : गेल्या आठवड्यात संभाजीनगरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. लोकांनी सभेला दिलेला प्रतिसाद बघता भारतीय जनता पक्षाचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच भाजपकडून विरोधाचे सूर काढले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. नागपूर शहरातील कस्तुरचंद पार्क मैदान आणि यशवंत स्टेडियमवर राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. शहरात दुसरे मोठे मैदान नाही. दर्शन कॉलनी मधील मैदान महाविकास आघाडीने निवडले असून त्याचं मैदानावर सभा घेतली जाईल असा पवित्रा काँग्रेससह इतर मित्र पक्षांची घेतला आहे.
कृष्णा खोपडेच्या मतदारसंघातील मैदान : महाविकास आघाडीची सभा असलेले मैदान हे कृष्णा खोपडे यांच्या मतदार संघात येते. महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांची सभा मतदार संघात झाल्यास त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच कारणामुळे कृष्णा खोपडे सक्रिय झाल्याची कुजबुज आहे. एकूणच सभेला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केल्यावर आता नागपूर सुधार प्रण्यास काय भूमिका घेते हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.
कस्तुरचंद पार्क मैदान आरक्षित : आतापर्यंत सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका कस्तुरचंद पार्क मैदानावर झाल्या आहेत. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मायावती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा या मैदानावर झाल्या आहेत. मात्र, कस्तुरचंद पार्क हे हेरिटेज वास्तू असल्याने या मैदानाचा वापर राजकीय सभांसाठी करता येणार नाही. तसेच यशवंत स्टेडियमलाही राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाही.