नागपूर - शहरातील गणेशपेठ परिसरात अज्ञात व्यक्तींनी ६ ते ७ वाहनांच्या काचा आणि इतर साहित्याची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याने नागरिकांमध्ये संतपाचाी लाट उसळली आहे. त्यामुळे पोलीस त्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा शोध घेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचे आव्हान पोलिसांसमोर नेहमीच उभे ठाकलेले असते. आजदेखील अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राडा घातला. हॉटेलच्या काउंटरवर तोडफोड केली, तर हॉटेलसमोर उभ्या असलेल्या गाड्या देखील फोडल्या. त्यांनंतर आपला मोर्चा सेवा सदनकडे वळला. त्याठिकाणी देखील काही वाहनांची तोडफोड केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तोडफोड करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला. मात्र, तोपर्यंत गुंड पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या तोडफोडीमागील कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र, संबंधीत गुंडांना ताब्यात घेतल्यानंतरच यामागील कारण स्पष्ट होणार आहे.