नागपूर : राज्यात सुरू असलेल्या घडामोडीनंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे याची चर्चाही रंगू लागली आहे. तर रविवारपासून उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांचा त्यांचा दौरा आहे. त्यात ते यवतमाळ आणि अमरावतीला जाणार आहेत. याशिवाय ते पोहरादेवीला दर्शनासाठी जाणार आहेत. दौऱ्यात ते नागपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.
असा असणार पहिला दिवस : उद्या सकाळी (रविवारी) उद्धव ठाकरे हे मुंबईवरून विमानाने नागपुर विमानतळावर येतील. त्यानंतर ते मोटारीने यवतमाळकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी यवतमाळ येथे आगमन झाल्यानंतर पोहरादेवी येथे दर्शनासाठी जाणार आहेत. पोहरादेवी दर्शन आणि महंतांशी चर्चा केल्यानंतर ते यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत पक्षवाढीच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्यानंतर ते दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे संध्याकाळी यवतमाळ येथून रात्री अमरावतीला जातील आणि तिथे रात्री मुक्काम करणार आहेत.
दौऱ्याचा दुसरा दिवस : विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे अमरावती आणि अकोलाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत. त्यानंतर ते अमरावती व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ते अमरावतीवरून नागपूरला येणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संवाद साधून मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
संकटकाळी पक्षाला मजबूती देण्यासाठी : गेल्या वर्षभरापासूनच उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना हा संकटकाळातून मार्गक्रमण करत आहे. रोजच्या रोज नेतेमंडळी पक्षाला रामराम करत आहेत. ज्यांच्या खांद्यावर पक्ष वाढीची धुरा होती, तेच नेते पक्षाला सोडून गेल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला आहे.
विदर्भाकडे लक्ष दिल्यास फायदा होईल का : उद्धव ठाकरे गटाची विदर्भात तशी फार काही ताकद नाही. मात्र, याच विदर्भाने त्यांना दोन खासदार दिले होते. त्यांच्या पक्षात बंडखोरी झाल्यानंतर वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटात गेल्यामुळे, ठाकरे गट विदर्भात स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत असताना आता उध्दव ठाकरे यांनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा -
- Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान! अमरावती शहरात झळकले पोस्टर
- Maharashtra Political Crisis : राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये... शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस
- Banner In Nagpur : राज-उध्दव एकत्र यावे यासाठी कार्यकर्त्यांनी नागपुरात लावले बॅनर; महाराष्ट्राला तुमची गरज...