नागपूर - महायुतीमध्ये सेनेकडं उद्योग खाते होते. त्यामुळे एका बाजूला देसाई तर दुसऱ्या बाजूला कसाई होते, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर पलटवार केला. मेक इन इंडीयानंतर नोटबंदी आणि जीएसटी आणल्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली. आम्ही धर्म आणि राजकारण एकत्र करण्याची चूक केली, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्ला केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण हिंदुत्व, गायीबद्दलचे मत तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट विधानसभेमध्ये भाजपला विचारला. हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्दावरुन टीका करणाऱ्या भाजपाला उद्धव ठाकरे यांनी कोंडीत पकडले होते. सावरकरांच्या गायीबद्दलच्या विचारांचा त्यांनी दाखला दिला. तुमच्या सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला, पण तो कायदा देशभरात का लागू झाला नाही ? असा सवाल उद्धव यांनी भाजपला विचारला.
हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आणि विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले'
गोवंश हत्याबंदी कायद्यावरुन त्यांनी गोव्याचा दाखला दिला. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोमांस कमी पडू देणार नाही, असे म्हणाले होते. तसेच मी बीफ खाणार हे किरेन रिजीजू यांचे विधान होते. तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केला मग, तो देशभरात का लागू केला नाही? महाराष्ट्रात गाय माता आणि बाजूला जाऊन खाता, अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे भाजपवर टीका केली.
उद्धव यांनी आपल्या भाषणातून भाजपशासित राज्यांमध्येच गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाला नसल्याचे दाखवून दिले. सावरकर कोणाला शिकवताय तुम्हाला तरी ते कळलेत का ? असे उद्धव ठाकरे म्हणाले. मागच्या आठवड्यात दिल्लीच्या रामलीला मैदानावर सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी ‘माझे नाव राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे. माफी मागणार नाही’ असे म्हणाले होते. भाजपने हा विषय उचलून धरला. सावरकरांबद्दल केलेल्या विधानावर राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली होती. शिवसेना आणि काँग्रेस राज्यामध्ये एकत्र सत्तेवर असल्याने शिवसेनेची कोंडी करण्याची रणनिती भाजपची होती. त्याच विषयावर आज उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत उत्तर दिले.
हेही वाचा - राज्याची आर्थिक स्थिती समजून घेतल्यानंतरच कर्जमाफीचा निर्णय - अजित पवार
उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांची शेतकरी विरोधी वक्तव्य वाचून दाखवली. 1992-93 मध्ये बाबरी झाल्यानंतर जे मुग गिळून बसले होते. अच्छे दिन येईनाच, 2 कोटी रोजगार मिळेनाच, 15 लाख मिळेनाच, काळा पैसा परत येईनाच, मंदी हटेनाच, असं सांगत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी वाचलेल्या भारुडाची खिल्ली उडवली.
सीमावासीयांवर होणारे भाषिक अत्याचार कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे म्हणाले, कर्नाटक आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. आता सीमाप्रश्न कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केला पाहिजे. देशातल्या हिंदुंना न्याय देणार नसाल, तर परदेशातील हिंदूंचा पुळका कशाला? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित केला.