नागपूर : नागपूर, गडचिरोली, चंद्रपुरात 6 कंपन्या आल्या आहेत. त्यांच्यासोबत सामंजस्य करारदेखील झाला आहे. विदर्भात 60 हजार 450 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. राज्यातील उद्योगांच्या स्थितीवर पावसाळी अधिवेशनात आम्ही श्वेतपत्रिका काढणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी केला आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची अमरावती येथील उद्योजकांसोबत बैठक झाली आहे. नागपुरातील उद्योजकांसोबत आम्ही बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांचा दौरा करून उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अँकर युनिट विदर्भात आले तर पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पही येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
फॉक्सकॉन कंपनीबाबत काय? सुरुवातीला महाराष्ट्रात येणारी फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये वेदांता कंपनीसोबत चिप बनवण्याचे उत्पादन करणार होती. मात्र कंपनीला कोणीही भागिदार न मिळाल्याने फॉक्सकॉन कंपनीने वेदांता कंपनीसोबतची भागिदारी संपुष्टात आणत असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पावरून शिंदे फडणवीस सरकारवर मोठी टीका झाली होती. त्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अग्रवाल (वेदांत प्रकल्प) यांना भेटले होते. त्या कंपनीने सांगितले की आम्हाला महाराष्ट्रात यायचे नाही, त्यामुळे गुजरातला गेले. एअरबस प्रकल्पाच्या संदर्भात कुठलाही पत्रव्यवहार कधी झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्योजकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात नवीन सिडीसीपीआर उद्योजकांपर्यंत पोहचवला जात असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. याशिवाय उद्योजकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी दिली आहे. एमआयडीसी अंतर्गत रस्ते, पाणी, आयटी सेक्टर, डेटा सेंटरसाठी काय या सर्व प्रश्नांची उत्तरे नवीन सीडीसिपीआरमध्ये देण्याचा प्रयत्न केला असल्याची त्यांनी माहिती दिली.
अजित पवारांची दिल्ली वारी : अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीला गेले याबाबत मला काहीच माहिती नसल्याचे ते म्हणाले आहेत. सत्तांतराला आता बारा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आमच्या 40 जणांचा विश्वास शिंदे यांच्यावर आहे. ते आमची काळजी घेतील. एखादे कोणी बोलले तर ती पार्टीची लाईन नाही. बच्चू कडू यांची समजूत आम्ही घालणार आहोत. मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत कोणी नाराज असू शकते, असे ते म्हणाले आहेत.
बुटीबोरी एमआयडीसीसाठी 100 कोटी : विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग यावे यासाठी 13 हजार कोटींचा सामंजस्य करार मागच्या काळात झाले आहेत. ते कामही लवकर सुरू होतील. बुटीबोरी एमआयडीसीसाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे, म्हणून राज्यात एक लाख 18 हजार 422 कोटींची गुंतवणूक राज्यात आणली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होतील. भविष्यात शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :