नागपूर - सीताबर्डी पोलिसांनी ३ आरोपींना अटक करून दुचाकी चोरीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एकूण २० दुचाक्या चोरल्याची कबुली आरोपींनी दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुस्थितीत असलेल्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच उर्वरित गाड्या आरोपींनी भंगार विक्रेत्याला विकल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पोलिसांनी भंगार विक्रेत्यालाही अटक केली आहे. अनिकेत बडोदे आणि शमीम उईके असे या अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात नागपूर शहराच्या मुख्य भागातून गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. पोलिसांनी वाढत्या चोरीच्या घटना थांबवून आरोपींना अटक करण्यासाठी ऑपरेशन 'क्रॅक-डाऊन' सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत शहराच्या विविध भागात नाकेबंदी लावण्यात येत होती. त्याच दरम्यान सीताबर्डी पोलिसांना अनिकेत बडोदे आणि शमीम उईके नावाचे दोन रेकॉडवरील चोरटे वाहन चोरी करून पळून जात असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी २० दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. उर्वरित गाड्या आरोपींनी भंगार विक्रेत्याला विकल्याचा खुलासा केल्यानंतर पोलिसांनी तिसरा आरोपी शेख इमराण शेख हुसेन याला अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीकडून पोलिसांनी अनेक गाड्यांचे पार्ट आणि भंगार जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ४ लाख ६० हजार इतकी असून आणखी काही गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.