नागपूर - नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या नगररचना विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सव्वा लाखाची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे काटोल नगर परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नगर रचनाकार दिनेश गायकवाड आणि सहायक रचनाकार विपिन भादककार या दोघांचा समावेश आहे.
एकाची भूमिका संशयास्पद
काटोल येथील राधेश्याम बासेवार यांचा एक भूखंड काटोल नगर परिषदकडे गहाण आहे. तो भूखंड सोवडण्यासाठी बसेवार यांनी अर्ज केला होता. त्याकरिता नगर रचनाकार दिनेश गायकवाड आणि सहायक रचनाकार विपिन भादककार यांनी तब्बल अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर एक लाख २५ हजार रुपयांमध्ये सौदा पक्का झाला, मात्र राधेश्याम बासेवार यांना लाच देण्याचीची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात जाऊन केली. तक्रारीची सत्यता पटविल्यानंतर एसीबीच्या पथकाने काटोल येथील धवड लेआऊट परिसरातील एका घरी सापळा रचून दोन्ही लाचखोरांना अटक केली आहे. या प्रकरणात भारत मेटकरी नावाच्या इसमाची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती पुढे आली आहे.
वारंवार सुरू होती पैशाची मागणी
तक्रारदार राधेश्याम बासेवार यांनी दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांना आधीच पंचवीस हजार रुपये होते. मात्र त्यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी होत असल्याने बासेवार यांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.