नागपूर : नागपूर शहरात सुरू झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या नागरी संस्था अर्थात सी-२० बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत नागपूर विमानतळ येथे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर करून केले.नागरी संस्थांच्या बैठकीच्या उद्घाटनासाठी नोबल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सत्यार्थी यांचे मनपाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर करून स्वागत केले.
पाहुण्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत : नागपूर शहरात सोमवार २० मार्चपासून नागरी संस्थांच्या बैठकीला सुरूवात झाली. बैठकीच्या अनुषंगाने नागपूर शहरात रविवारपासूनच जी- २० सदस्य देशांसह आमंत्रित देशांतील मान्यवरांचे आगमन होत आहे. शहरात येणा-या या विदेशी पाहुण्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलय. यात नागपूर मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून देशाच्या विविध भागातील संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करून स्वागत केले जात आहे.
कैलाश सत्यार्थींनी केले कौतुक : देशाच्या विविध भागातील संस्कृती आणि परंपरा दर्शविणारी वेशभूषा आणि त्यानुसार ‘त्या’ राज्यातील नृत्याचे सादरीकरण करून येणा-या पाहुण्याचे मनपाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. पाहुण्यांचे स्वागत करणा-या चिमुकल्यांचे कैलाश सत्यार्थी यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
सी-20 परिषदेचे उद्घाटन : शहरात उद्यापासून २१ मार्चपर्यंतदरम्यान सी-२० परिषद आयोजित होत आहे. रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सी-२० परिषदेचे उद्घाटन झाले. सी-२० साठी तयार करण्यात आलेल्या विविध १४ विषयांवर या परिषदेत विचारमंथन होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.
प्रतिनिधींना कार्यक्रमाचे आकर्षण : फुटाळा तलावातील पाण्यातून गुंजणारे सप्तस्वर,पाण्याचा थुई-थुई नाच, रंगसंगतीमुळे तलावात निर्माण होणारा इंद्रधनुष्याचा भास. पाण्यासोबत येणारे आगीचे लोट व त्यातून तयार होणारी पाण्याची सुंदर ‘स्क्रीन’ आदीचा समावेश असलेल्या संगीत कारंजाच्या विशेष कार्यक्रमाने माता अमृतानंदमयी यांच्यासह सी-20 प्रतिनिधींना भुरळ पाडली. आकाशातील आतषबाजीने येथील परिसर निनादून गेला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंगावर रोमांच उभे करणारा क्षण : कारंजाच्या माध्यमातून तयार झालेल्या स्क्रीनवर महानायक अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त शैलीने इंग्रजी भाषेत नागपुरचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला. जगविख्यात संगीतकार ए.आर.रहेमान यांच्या संगीत संयोजनाने सजलेल्या या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित सी-20 प्रतिनिधीं टाळ्यांच्या गजरात दाद देत होते. प्रत्येक क्षण अंगावर रोमांच उभे करणारा होता. यानंतर आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा सर्व सोहळा डोळ्यात भरून घेताना उपस्थितांमध्ये एकच उत्साह दिसून आला. तत्पूर्वी, पाहुण्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. खादीचे स्टोलही पाहुण्यांना देण्यात आले.
पोलीस जी-20 वाटिकेचे उद्घाटन : उपराजधानीत 20 ते 21 मार्च दरम्यान सी- 20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील पोलीस भवन येथे तयार करण्यात आलेल्या ‘जी-20’ अंतर्गत सी-20 वाटिकेचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, पोलीस आयुत अमितेशकुमार, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल : गाला डिनरच्या पूर्वी मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात बासरी, सितार, व्हायोलिन, संतूर आणि तबला यांची जुगलबंदी वैदर्भीय कलाकारांनी सादर केली. अरविंद उपाध्ये यांनी बासरी, शिरीष भालेराव (व्हायोलिन), वात्मिक धांडे (संतूर) अवनींद्रा शेओलिकर (सितार), संदेश पोपटकर यांनी तबल्याची जुगलबंदी सादर केली.जुगलबंदीनंतर विदर्भाची लोकधारा या कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत गोंधळ, लावणी, सादर करण्यात आले. यवतमाळ येथील डॉ. राहुल हळदे आणि त्यांच्या चमूने गोंधळ आणि लावणी सादर केली. तर सुरेश घोरे आणि त्यांच्या चमूने चितकोर हे नृत्य सादर केले. शहनाई वादन विज्ञानेश्वर खडसे यांनी केले.
वैदर्भीय व्यंजनांची मेजवानी : गाला डिनरचे आयोजन नागपूर सुधार प्रन्यासमार्फत करण्यात आले. यात वैदर्भीय खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. यात धिरडे, ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी, पुरणपोळी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थांची तसेच बटाटा वडा, पनीर टिक्का,चिली चिकन, पाटवडी रस्सा, फिश करी, मसाला भात, पायसम या वैदर्भीय खाद्यपदार्थांची चव मान्यवरांना चाखायला मिळाली. यासोबतच मान्यवरांसाठी अनेक देशी विदेशी खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी गाला डिनरचे संपूर्ण नियोजन केले होते. सजवलेली भारतीय बैठक आणि चौरंगावर वाढलेल्या ताटामध्ये सुग्रास जेवणाचा बेत लक्षवेधी होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.