नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागपुरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. आज जनता कर्फ्यूचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. जनता कर्फ्यूनंतर नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. या दोन दिवसीय कर्फ्यूनंतरही प्रशासनाची करडी नजर राहणार, असल्याचे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. या जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी या कर्फ्यूप्रमाणेच आपल्या जीवनशैलीत बदल करा, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले.
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूनंतरही दुकानांवर अनावश्यक गर्दी करू नये, दुकानदारांनी देखील नियमांचे पालन करावे, जर नियमांचे पालन केले नाही तर प्रशासनाला कडक कारवाई करावी लागेल, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
बाजारपेठेतील दुकानदारांनी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेतच काम करावे. दुकानांसाठी सम-विषम पद्धत पुढेही कायम असणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. नागरिकांनी व दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक दंड देखील भरावा लागेल. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंढे यांनी केले.