नागपूर Tukaram Mundhe : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना ते स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सुद्धा प्रमुख होते. त्यावेळेस स्मार्ट सिटी प्रकल्पातील महिला अधिकाऱ्याने त्यांच्या विरोधात गैरव्यवहाराची तक्रार पोलिसांकडे दिली होती. मात्र, त्या तक्रारी बद्दल पोलिसांनी अनेक महिने झाल्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता गृह विभागाकडून तुकाराम मुंढेंविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल १२ ऑक्टोबर पर्यंत सादर करा, असे निर्देश नागपूरच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आलेत.
तुकाराम मुंढेच्या अडचणीत वाढ होणार : पूर्व-नागपूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात अपिलही केलं होतं. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवर पोलीस कारवाई का करत नाही, यासाठी त्यांनी माहिती आयुक्तांकडे विचारणा केली आहे. त्या अपीलावर माहिती आयोगात सुनावणी झाली. त्यानंतर माहिती आयोगाकडून पोलिसांना त्वरित कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
कारवाईसाठी पोलिसांची टाळाटाळ : माहिती आयोगाकडून आदेश मिळूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांनी गृह विभागाकडे त्या संदर्भात विचारणा करत तक्रार दिली. दरम्यान, त्याच तक्रारीच्या आधारावर आता गृह विभागाच्या उपसचिवांनी पोलीस आयुक्तांना १२ ऑक्टोबरपर्यंत तुकाराम मुंडेंविरोधातील तक्रारीवर आजवर काय कारवाई केली, यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण : नागपूर महापालिकेत आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचीही सूत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यावेळी मुंढेंवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणारी तक्रार तत्कालीन महापौर संदीप जोशी आणि सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी २२ जून २०२० रोजी केली. त्यानंतर सातच दिवसांनी एका महिला कर्मचाऱ्याने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तक्रारींचे पुढे काय झाले, अशी विचारणा भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी माहिती अधिकारांतर्गत केली. त्यांना योग्य उत्तर मिळालं नाही त्यामुळे त्यांनी माहिती आयोगाकडे अपील केले. पुढे माहिती आयुक्त राहुल पांडेंनी लवकरात-लवकर प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा -
IAS Officer Transfers : राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या