नागपूर - युती म्हटलं तर चर्चा होणारच आहे. ही युती सोमवारी सायंकाळच्या मुहूर्तावर होणार आहे. दोन दिग्गज एकत्र येणार असले तरी राजकीय पक्षांशी याचा काहीही एक संबंध नाही. कारण ही युती राजकारणातील नसून, आकाश गंगेतील आहे. या क्षणाची अनेकजण वाट पाहत आहेत. आजचा दिवस सर्वात लहान असल्याने या युतीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चला तर जाणून घेऊयात या खास युतीबाबत
तब्बल 800 वर्षांनी आला असा दुर्मिळ योग
पृथ्वीपासून करोडो मैलावर होणारी युती, दुसरी तिसरी कोणाची नसून गुरु आणि शनीची आहे. गुरु पृथ्वीपेक्षा 11 पट आकाराने भव्य आहे. तर शनी हा 9 पट मोठा आहे. दोन्ही ग्रह पृथ्वीपासून दूर आहेच. पण एकमेकांनपासून सुद्धा करोडो मैल लांब आहेत. पृथ्वीवरून आकाशात पाहिले असता हे दोन्ही ग्रह एका रेषेत असणार आहे. डिग्रीमध्ये सांगायचे झाले तर हे अंतर 0.1 डिग्री असणार आहे. यामुळे हा क्षण 800 वर्षांनी पाहायला मिळणार आहे.
यापूर्वी काय घडले होते?
गुरु हा सर्वात मोठा ग्रह असून गुरु आणि शनीची युती पाहाण्याचा योग हा दर वीस वर्षांनी येतो. यापूर्वी 28 मे 2000 ला अशी युती झाली होती. आता यानंतर गुरु शनीची पुढील युती ही 31 ऑक्टोबर 2040 मध्ये होणार आहे. मात्र प्रथमच 800 वर्षानंतर गुरु आणि शनी एकोनंएकांच्याच एवढे जवळ पाहायला मिळणार आहे. असा योग हा 800 वर्षातून एकदा येतो.
असे का घडते? काय आहे नेमकं हे कोडं....
दोन्ही ग्रह हे सूर्याच्या भोवती फिरतात. पण दोघांना लागणार कालावधी हा भिन्न आहे. गुरुला सूर्याभोवती फिरण्यासाठी 12 वर्ष लागतात. तर शनीला 30 वर्ष लागतात. याचदरम्यान दर 20 वर्षांनी या ग्रहांची युती पाहाण्याचा योग येतो. यंदा हा दुर्लभ योग डोळ्याने पाहाता येणार आहे.
रमण सायन्स सेंटरमध्ये पाहाता येणार ही युती....
हा क्षण पाहण्यासाठी लाहानग्यापासून मोठ्यापर्यंत अनेक जण रमण सायन्स सेंटरला भेट देत आहेत. रमण सायन्स सेंटरला दोन खास दुर्बिणीतून हे अवकाशात दिसणारे चित्र अगदी जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज होणारी शनी आणि गुरुची युती नेमकी काय असेल. याबाबत अधिक माहिती दिली आहे, रमण सायन्स सेंटरचे तारामंडल अधिकारी महेंद्र वाघ यांनी.