नागपूर - शहराच्या सीमेवर असलेल्या मिहानमधली एसईझेड प्रकल्प परिसरात वाघाचा वावर असल्याचे समोर आले आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये देखील वाघाची उपस्थिती कैद झाली आहे. त्यामुळे या परिसरात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामधील याच रस्त्यावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वाघ दिसला होता. अफजल हुसैन नावाच्या मजुराने वाघ पाहिला. त्यानंतर प्रवीण कोंबाडे नावाच्या सुरक्षा रक्षकाने सुद्धा वाघ पाहिला. दोन्ही घटनांची माहिती मिहानमधील सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली गेली. त्यांनी तत्काळ वन विभागाला कळविले. वन अधिकाऱ्यांनी वाघाचा वावर असलेल्या परिसरात पाहणी सुरू केली. त्यावेळी त्यांना काही ठिकाणी वाघाच्या पायाचे ठसे आढळले. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत वन विभागाने मिहान परिसरात सुमारे 25 ट्रॅप कॅमेरे लावले. त्यापैकी एका कॅमेऱ्यामध्ये रात्रीच्या वेळी वाघाची उपस्थिती चित्रित झाली आहे.
नागपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले मिहान विशेष आर्थिक क्षेत्र 4 हजार 25 हेक्टर एवढ्या विस्तीर्ण परिसरात पसरले आहे. मिहानमध्ये विमानतळ, रेल्वे टर्मिनल, कार्गो हबसह इन्फोसिस, टीसीएस, इन्फोसेप्ट, जीआयएफ, ल्युपीन, डसाल्ट, टाल, महिंद्रा अशा नामांकित कंपन्यांचे कार्यालय आहेत. शेकडोंच्या संख्येने काम करणारे या भागात येतात. त्यामुळे या सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूरच्या अवतीभवतीच्या परिसरात मानवी वस्तीमध्ये वाघाचा वावर असल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी कळमेश्वर, फेटरी, खडगाव, सहारा सिटी या भागात देखील वाघाने दहशत घातली होती.