नागपूर- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना आरोग्य व्यवस्था अगदीच कुचकामी ठरत आहे. हजारो रुग्ण बेड मिळावे या करिता वन-वन भटकत आहेत. अशातच शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा करणारी लाईन फुटली आहे. ती अद्याप नादुरुस्त आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच ऑक्सिजनची लाईन टाकण्यात आली होती. लाईन फुटून ५ दिवस झाले आहेत, मात्र तिची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे, कोरोना परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
ऑक्सिजन लाईन ३ तारखेला फुटली होती. मात्र, आजमितीस ही लाईन दुरुस्त करण्यात आली नाही. शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर शेकडो रुग्ण भर्ती आहेत. मात्र, रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने रुग्णालयात भर्ती असलेल्या रुग्णांना मेयो येथे हलविले जात आहे. रुग्णालयातील रुग्णांची व्यवस्था इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) येथे करायला सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची मागणी केली होती. ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे, रुग्णालयात भर्ती असलेल्या रुग्णांची परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे.
हेही वाचा- नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनामुक्त